Ad will apear here
Next
अजित आगरकर, दादा साळवी, मोतिलाल
क्रिकेटपटू अजित आगरकर, मराठी चरित्र अभिनेते दादा साळवी आणि हिंदी अभिनेते मोतिलाल यांचा चार डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........

क्रिकेटपटू अजित आगरकर : 
माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याचा चार डिसेंबर १९७७ हा जन्मदिन. मुंबईत जन्मलेल्या अजित आगरकरने २६ कसोटी (५८ विकेट्स), १९१ वनडे (२८८ विकेट्स) आणि चार टी-२० (३ विकेट्स) सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याशिवाय ११० प्रथम श्रेणी सामने, २७० ‘अ’ श्रेणीचे सामने आणि ६२ टी-२० सामनेही खेळले आहेत. फलंदाज म्हणूनही अजित आगरकरने वेळोवेळी योगदान दिले. कसोटीत त्याच्या नावावर एक शतकही जमा आहे. ते त्याने २००२मध्ये लॉर्डस् मैदानावर इंग्लंडविरुद्ध (नाबाद १०९) झळकवले होते. 

१९९९-२०००च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग सात वेळा तो शून्यावर आउट झाला. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी त्याला ‘बॉम्बे डक’ हे टोपणनाव ठेवले. संघातील त्याच्या स्थानाबद्दल सर्वत्र चर्चा होत होती; पण त्याने शांतपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि अॅडलेड कसोटीत ४१ रन्स देऊन सहा विकेट घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच सीरिजमध्ये त्याच संघाबरोबर मेलबर्नला ४२ रन्स देऊन सहा विकेट घेऊन एकदिवसीय सामन्यांतही आपली जागा पक्की केली. 

एकदिवसीय सामन्यांत सर्वांत जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अजूनही अजित आगरकरच्या नावावर आहे. त्याने २१ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. २००७ नंतर त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. ‘वनडे’त कमी सामन्यांत (२३ सामन्यांत) ५० विकेट्स घेण्याचा विक्रमही जवळपास १० वर्षे त्याच्या नावावर होता. हा विक्रम २००८मध्ये श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने मोडला. वेगवान गोलंदाज म्हणून एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या अजित आगरकरने २००२मध्ये फातिमा घडियालीसोबत लग्न केलं.  
.........

चरित्र अभिनेते दादा साळवी :
मराठीतील नामवंत चरित्र अभिनेते दिनकर शिवराम उर्फ दादा साळवी यांचा जन्म चार डिसेंबर १९०४ रोजी रत्नागिरीतील फणसोप येथे झाला. शालेय शिक्षण करून दादा साळवी पोलीस खात्यात शिरले. ते गावात सणासुदीला आणि जत्रेमध्ये नाटकांतून कामही करत असत. नाटककार टिपणीस यांनी त्यांचे काम पाहिले आणि ते दादा साळवींना घेऊन मुंबईत आले. के. बी. आठवले हे त्या वेळेस शेठ वझीर अझीज यांच्या एक्सलसिअर फिल्म कंपनीत व्यवस्थापक, नट आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहत. त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी सुशिक्षित माणसांची गरज भासत असे. त्यांनी साळवी यांना २५ रुपये पगारावर कंपनीत तत्काळ नोकरीस घेतले. 

१९२८ साली ‘खून-ए-नाहक’ या पहिल्या मूकपटात दादा साळवी यांना भूमिका देण्यात आली. चित्रपटातले साळवींचे काम पाहून इम्पिरियल फिल्म कंपनीने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले व त्यांना पगारही वाढवून मिळाला. इम्पिरियलमध्ये साळवींनी ‘मदनमंजरी’, ‘इंदिरा बीए’, ‘भोलाशिकार’, ‘सिनेमा गर्ल’, ‘हमारा हिंदुस्थान’, ‘रात की बात’, ‘खुदा की शान’ असे पंधरा-वीस मूकपट केले. तसेच पॅरामाउंट फिल्म कंपनीसाठी जयंत देसाई दिग्दर्शित ‘पोलादी पहलवान’ हा चित्रपट केला.’आलम आरा’ या पहिल्या बोलपटातही दादा साळवींची भूमिका होती. 

दादासाहेब तोरणे यांच्या सरस्वती सिनेटोनसाठी साळवींनी ‘औट घटकेचा राजा’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘छत्रपती संभाजी’, ‘ठकसेन राजपुत्र’ हे चित्रपट केले. ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात ते कलुषा कबजीच्या भूमिकेत होते. त्यांची भूमिका पाहून कोल्हापूरच्या हंस चित्रने त्यांना निमंत्रण पाठवले आणि चांगला तीन आकडी पगारही देऊ केला.

१९३७ सालचा ‘प्रेमवीर’ हा त्यांचा ‘हंस’मधला पहिला चित्रपट आणि तेथूनच मा. विनायक आणि दादा साळवी ही जोडी जमली. ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटामध्ये दादा साळवी नायिकेच्या वडिलांच्या (वन अधिकाऱ्याच्या) भूमिकेत होते. त्यांची ही भूमिका पाहून दुर्गा खोटे यांनी साळवींना ‘सवंगडी’ या आपल्या चित्रपटात भूमिका दिली. हंसच्या ‘ब्रँडीची बाटली’मध्ये त्यांनी दारूबाज हेडक्लार्कची भूमिका केली. ‘देवता’मध्ये प्रेमळ पिता, ‘अर्धांगी’त अरुंधती एमए या पदवीधर विदुषीचा नवरा प्रोफेसर वसिष्ठ यांची भूमिका केली. 

‘हंस पिक्चर्स’चे पुढे ‘नवयुग चित्रपट लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. ‘अमृत’ हा त्या कंपनीचा चित्रपट होता. त्या चित्रपटात कोकणातील सावकार म्हणजे खोत यावर बाप्पा हे पात्र बेतले होते. त्यातील इरसाल बाप्पा आणि साधाभोळा कृष्णा चांभार (बाबूराव पेंढारकर) यांची पडद्यावरील अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. ‘नवयुग’मध्ये साळवी यांनी ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’, ‘तुझाच’ हे चित्रपट केले. सर्व चित्रपटांतील त्यांचा अभिनय अप्रतिम झाला होता. 

मा. विनायकांनी नवयुग कंपनी सोडली व ‘प्रफुल्ल’ ही स्वत:ची चित्रसंस्था स्थापन केली आणि ‘माझं बाळ’ हा गंभीर विषयावरचा चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटात दादा साळवी हे बॅरिस्टर मनोहरच्या मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिकेबद्दल वर्तमानपत्रातून रकानेच्या रकाने भरून कौतुक करण्यात आले. ‘चिमुकला संसार’, ‘गजाभाऊ’, ‘बडी माँ’, ‘सुभद्रा’ या मा. विनायकांच्या चित्रपटांतून साळवी यांनी एकाहून एक सरस भूमिका रंगवल्या. 

१९४७ मध्ये मा. विनायकांचा मृत्यू झाला आणि प्रफुल्ल कंपनी बंद पडली. तेव्हा व्ही. शांताराम यांनी दादा साळवी यांना ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’मध्ये डॉ. चोळकरांची भूमिका दिली, तर जयंत देसाई यांच्या ‘तदवीर’मध्ये खलनायक आणि ‘महाराणा प्रताप’मध्ये राणा प्रतापच्या मध्यवर्ती भूमिकेत ते होते. प्रभात फिल्म कंपनीने त्यांना ‘रामशास्त्री’ बोलपटासाठी बोलावले. साळवींनी हा चित्रपट नाकारला. १९४७ सालातच मंगल पिक्चर्सने त्यांना ‘जिवाचा सखा’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. त्यानंतर मराठी चित्रपटातून त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘वादळ’, ‘कांचनगंगा’, ‘कुलदैवत’, ‘सांगत्ये ऐका’, ‘शिकलेली बायको’, ‘अंतरीचा दिवा’, ‘उमज पडेल तर’, ‘भैरवी’, ‘कन्यादान’ या चित्रपटांत भूमिका केल्या. आपल्या सुनेचा पुनर्विवाह लावून देणारा सासरा ही ‘कन्यादान’ या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच गाजली. त्यानंतर त्यांनी ‘सवाल माझा ऐका’ ‘मल्हारी मार्तंड’, ‘जानकी’ यांसारखे अनेक चित्रपट केले. 

साळवी यांनी इम्पिरियल फिल्म कंपनीत असताना नटी सखूबाईशी प्रेमविवाह केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांचा हा पहिला प्रेमविवाह. त्या वेळेस हा विवाह चर्चेचा विषय ठरला होता. दादा साळवी यांचे निधन २९ ऑक्टोबर १९८० रोजी झाले.
.............

अभिनेते मा. मोतिलाल :
चार डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे मोतिलाल राजवंश उर्फ मा. मोतिलाल यांचा जन्म झाला. आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती.

त्यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर नौसेनेत जाण्यासाठी ते मुंबईला आले होते; पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपटसृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४मध्ये सागर फिल्म कंपनीच्या ‘शहर का जादू’ या चित्रपटात नायक म्हणून त्यांनी पहिले काम केले. 

शादी, परदेसी, अरमान, ससुराल, मूर्ति, देवदास, जागते रहो व अछूत कन्या हे त्यांचे गाजलेले चित्रपट. मा. मोतिलाल यांचे ‘जागते रहो’मधील गाणे ‘ज़िंदगी ख्वाब है’ हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. १७ जून १९६५ रोजी त्यांचे निधन झाले.

- संजीव वसंत वेलणकर, पुणे 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZYECH
Similar Posts
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत २६ नोव्हेंबर हा भारतातील धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन आणि ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय.....
मनोहर जोशी, बोमन इराणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन..... .
आशा काळे, अमृता खानविलकर, रझा मुराद, गीता दत्त मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उत्तम नर्तिका आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते रझा मुराद, गायिका गीता दत्त यांचा २३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language